मुंबई : डॉ. अपर्णा गोविल भास्कर आणि डॉ. देबराज शोम या मुंबईतील डॉक्टरांनी संयुक्तपणे लिहिलेल्या भारतातील पहिल्यावहिल्या रुग्ण व डॉक्टर हक्क जाहीरनाम्याचे प्रकाशन २८ मार्च २०१९ रोजी संघटनेचे अध्यक्ष डॉ. विपिन चेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतातील ११ हजार डॉक्टरांचे प्रतिनिधीत्व ही संघटना करते. या जाहीरनाम्यासाठी ‘एएमआय’ या संस्थेचे संस्थापक डॉ. ललित कपूर यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे सांगितले. डॉ. अपर्णा भास्कर आणि डॉ. देबराज शोम यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या ‘डीअर पीपल, वुइथ लव्ह अँड केअर, युवर डॉक्टर्स’ या पुस्तकात हा जाहीरनामा समाविष्ट करण्यात आला आहे. या पुस्तकामध्ये अनेक सहृदय डॉक्टरांनी त्यांना आलेले भावस्पर्शी अनुभव कथन केले आहेत. सध्या या पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया सुरू आहे आणि जुलै २०१९मध्ये जागतिक पातळीवर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हे पुस्तक ब्लूम्सबरी या प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित केले जाणार असून, दलाई लामा यांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे.
या जाहीरनाम्यात रुग्ण आणि डॉक्टरांचे हक्क अधोरेखित करण्यात आले आहेत. १७ विविध पैलूंबाबत दोघांची वर्तणूक कशी असावी याचे निकष निश्चित करण्यास मदत होते. यात समानुभूती, विश्वास, माहिती व संवाद, उपचारांचा खर्च, ओळख आणि व्यावसायिक स्थान, नोंदी व अहवाल, तातडीची वैद्यकीय सेवा, माहितीच्या आधारे परवानगी, गोपनीयता, सेकंड ओपिनिअन, भेदभावमुक्त, सुरक्षितता आणि दर्जेदार आरोग्यसेवा, सेवेतील कसूर, पर्यायी उपचार पर्याय, औषधे व चाचण्यांसाठीचा स्रोत, डिस्चार्ज, शिफारस व ट्रान्सफर आणि तक्रार निवारण हे पैलू समाविष्ट आहेत.
प्रकाशनप्रसंगी डॉ. शोम म्हणाले, ‘डॉक्टर आणि रुग्णांमधील नाते हे सर्वांत शुद्ध नाते असते. हे नाते पूर्वापार असेच चालत आले आहे. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत या नात्यामधील विश्वास कमी होत चालला आहे. काळ बदलला आहे. एके काळी डॉक्टरांना देव मानले जात असे आणि आता डॉक्टरांना सार्वजनिक पातळीवर मारहाण होताना दिसते. डॉक्टर आणि रुग्णांचे हक्क स्पष्टपणे नमूद करून डॉक्टर व रुग्णांमधील नाते पुन्हा पूर्वीसारखेच संतुलित व पवित्र करण्यास मदत करणे, हे या जाहीरनाम्याचे उद्दिष्ट आहे.’
डॉ. अपर्णा म्हणाल्या, ‘समाज यंत्रणेतील झालेल्या समस्यांमुळे डॉक्टर आणि रुग्णांमध्ये तेढ निर्माण झाल्याचे दिसत आहे आणि या तणावपूर्ण नात्याच्या मन विषण्ण करणाऱ्या अनेक बातम्या आपल्याला माध्यमांमधून समजतात. दोघांनाही एकमेकांबद्दल विश्वास वाटेनासा झाला आहे आणि ही व्याप्ती इतकी आहे की, संपूर्ण भारतच डॉक्टरांविरुद्ध लढा देतो आहे, असे वाटू लागले आहे. यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत आणि नात्यांमध्ये होत गेलेल्या या ऱ्हासाचे सखोल विश्लेषण करणे आणि कारणे शोधणे अत्यंत आवश्यक आहे. या जाहीरनाम्यामुळे या दोन्ही भागधारकांमध्ये सुसंवाद सुरू होईल आणि या सुंदर नात्याची वीण पुन्हा एकदा घट्ट व्हावी यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या असलेल्या परिस्थितीमध्ये बदल घडवून भारतातील डॉक्टर आणि रुग्णांमधील नात्यामध्ये सकारात्मकता निर्माण करता येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.’
‘एएमआय’चे अध्यक्ष डॉ. चेकर म्हणाले, ‘शेवटी वैद्यकशास्त्र हे प्रेम, माणुसकी आणि कनवाळूपणाचे प्रतिबिंब असते आणि रुग्ण व डॉक्टर यांच्यातील नाते पूर्वीसारखे करण्यासाठी दोहोंमध्ये परस्परसंवाद साधण्याची अत्यंत आवश्यकता आहे. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स या संस्थेतर्फे हा जाहीरनामा एकमताने स्वीकारण्यात आला आहे आणि जगात आज आरोग्य सेवा आणि डॉक्टर-रुग्ण यांच्यातील नात्यांबद्दल असलेल्या दृष्टिकोनाबद्दल या जाहीरनाम्याची दीर्घकालीन मदत होणार आहे.’
‘एएमसी’चे संस्थापक डॉ. कपूर म्हणाले, ‘आम्हा डॉक्टरांना वाटते की, रुग्ण व डॉक्टर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि एकाशिवाय दुसरा अपूर्ण आहे आणि त्याचे अस्तित्वही असू शकत नाही. या समाजाची जडणघडण आणि मूल्यांसाठी हे नाते अत्यंत महत्त्वाचे आहे.’
Article Source – http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5142443797243955132
Dr. Aparna Govil Bhasker is an accomplished Bariatric Surgeon and Laparoscopic GI Surgeon. Extremely passionate about her field of specialization. She completed her MBBS and MS in General Surgery in 2006, from Mahatma Gandhi Institute of Medical Sciences (MGIMS), Sewagram. Set up in 1967 by none other than the first health minister of India, Ms. Sushila Nayar, MGIMS is deeply rooted in Gandhian ethics. Read more